घासलेट

 आमनं धाकलपन

घासलेट

     "बाप्या,संध्याकायले दुकानवरून घासलेट लयीसन चिमनी भरी ठेवजो." माय धुडकामा ठेल भाकरवर तेल तिखटले तुकडाकन हालावत बोलनी.बायीसना टायीम होताच माय भाकर ली वावरमा गयी.

        गावना समदा बकऱ्या ढोरं चराले जावाले लागनात.गाडगासना खडडम खडडम आवाज आते कमी होवाले लागना होता.गल्लीमा धल्ला नि आमनासारखा धाकल्ला गडी सोडात तं कोनीच राये नही.दुपारना पहारले गलाटी नदी खुंदायनी की आम्ही घर येवूत.शायले सुट्टी तेनामुये गावन्या गल्लीनी गल्ल्या मजान्या फिरायेत.कोना घर पिच्चर लागेल रायना , तं तठेच आपला गल्लीनी समदी हेड बठेल सापडे.वानी गल्ली,चावडी,तेल गल्ली,भुई गल्ली,राम मंदीर नि पलाट समदा पाठ राये.सुट्टीनी तशी मजाच न्यारी राहे.

         शायना मास्तरसनी अभ्यास सांगा की तो झापट पडाना पहिलेच करी लेना पडे.नही तं सकाय सकायले उठीसन करना पडे.अभ्यास नही करा तं बेकार कुथाडेत.आज अभ्यास करानाच होता.दरोज संध्याकायले चिमनीमा घासलेट ओतीसन अभ्यासले बठनं म्हनजे गाया खावानच काम राये.

         संध्याकाय होताच खेनं सोडीसन मी घर उनू.कामडीना आमना दरवाजाना मझार हात घालताच किल्ली सापडायी.कुलूप उघडावं.मायनी समोर घासलेटना डब्बा,पैसा नि रेशनकार्ड ठेल दिसनं.घासलेट दुकानवर दोन तीन दिनना जायीसन परत येयी रायंतू.ह्या टायीमले समदं घासलेट सरी गयतं.चिमनीले हालायी देखं तं ती पन खालेच होती.आज घासलेट भेटाले पाहिजे म्हनीसन देवाराना पाय पडी लिना.

        पटकन दरवाजाले कडी लायीसन घासलेट लेवाले गवू.गाना म्हनत,डब्बा हालावत चालनू होतू.एक धल्ला घासलेट ली सन यी रायंता.तेले देखीसन भारी वाटनं.आज घासलेट भेटी म्हनीसन मनमान मनमा मी उड्या मारी रायंतू.दुकान येताच तठे देखं तं तठे दुकानदारच नही होता.घासलेट लेवाले येल लोकं तेनी वाट देखी रायंतात.समदा लोकं तठे घासलेटन्या डब्बा,डब्ब्या नंबर लायीसन उभा होतात.मी पन मना डब्बा नंबरले लायी दिना.बराच टायीम झाया तवय दुकानदार उना.बठेल समदाजन उठनात नि आपापला डब्बासपा जायीसना उभा रायनात.दुकानदार गडी गरम होयेल होता.तेनी तावतावमा सांगं,

"व्हा घरोघर.आते घासलेट भेटाव नही.गाडीवाला पा टाक्या ठेल सेत.सकाय सकायले आनन्या पडतीन त्या आते.डब्ब्या राहू द्या आठे.रामपायरामा भेटी घासलेट."

        समदा घरोघर निंघनात.मी थांबेलच होतू.घर घासलेटना तपास नही होता.आज आंधारामाच राहनं पडनार होतं.तेनामा दुकानदार सकायले घासलेट देनार होता.दुकानदारले सांगीसन काही फायदा नही झाया.परत घर वूनू.तदलोंग माय घर येल होती.घासलेट नही भेटनं म्हनीसन सांग.थकेल मायनी कोरी चहा पटकन पी लिनी.बोगनी घसाडाले लागनी.आंधारं पडाले लागनं होतं.दारे दार लाईटं लागनात.घरना समोरला ग्रामपंचायतना लाईटनं उजायं घरवर पडनं.मायनी त्या उजायामाच चुल्हावर पटकन रांधी लिनं.घरमा आज दिवाच लागेल नही होता.आम्ही भाऊबहिन बाहेर वटावरच खायीसन बठनूत.तदलोंग सुमन माय मायकडे वूनी.घरमा दिवा नही म्हनीसन बोलाले लागनी.

"ओ विमल,सयसांजे घरमा दिवा तं लाव.लकसमा कशी यी तुना घरमा." 

"माय,घासलेटच भेटनी नही आज." माय सुमनमायपा यीसन बोलनी.

"लय ती चिमनी.मी भरी लयसं घरतून.तुनं वूनं की दे माले.आंधारामा ठेवस का लेकरसले." सुमनमाय चिमनी घर ली गयी.

         थोडा टायीममा सुमनमायमुये घरमा चिमनी लागेल होती.घर उजायानं भरी गयतं.आम्हले आनंद होयेल होता.चिमनीपा पटकन मी अभ्यास कराले बठनू.आते बाहेरना खंबाना लाईट चिमनीमुये फिका वाटी रायंता.घासलेटनी चिमनी शांततामा चेटी रायंती आमनासाठे.


आमनं_धाकलपन

-भरत पाटील

9665911657




Comments

Post a Comment

Popular Posts