फुलं
फुलं
"संध्याकायले माले चुलापा बयतन पाहिजे.बाकी माले काही माहिती नही.दिनभर चकाट्या मारत फिरस.तू परत कोनले घरलोंग आन फक्त."
माय ताव तावमा भाकरना धुडकामा भाकर गुंडावत बोलनी.मी तिनाकडे देखत मान हालायी.तिले परत राग वुना.ती संताप करत बोलनी,
"चुलापा आज बयतन नही दिसनं तं संध्याकायनी भाकर नही भेटाव.ध्यानमा ठेवजो."
माय काल दिसनं काही इसरेल नही होती.गल्लीना पोरससोबत मंदिरांना नारय चोरीसन खावानी गिरायत मी घरलोंग आनी होती.मंदिरना राखनदार शंकरबाबानी बेकार हाल करा होतात आमना.तेनामा घर इसन खोड मोडाले पाहिजे म्हनीसन समदं खरंखरं सांगी रायंता.बाबाले मायनी कोरा चहा पाजीसन वाटे लावं,पन मना पुरता हाल करात.माले आरधी रातलोंग जेवन नही भेटनं होतं.परत मायना फटका सोबत होतातच.
माय वावरमा जावानी तयारी करी रायंती.सायकोर आजी येताच मायनी भाकर उचली नी जावाले लागनी.मायनी नजर आज आल्लकच होती.ती मन्हावर नाराज होती.तिले नही आवडे आसं काही. "घरनी चतकोर खावो पन आपला हात पाय आवरी राहो." अशे ती म्हने.पन दगडना देव कोठे नारय खायी म्हनीसन आम्ही देवले चढायेल नारय लांबांडा होतात.बेकार हासी खिदडी नारयनं पानी,खोबरं आम्ही मनसोक्त खादं होतं.
दुपारलोंग आतातथा दिवस काढा.बयतननी याद येताच गोखलामाधली दोरी लिसन मी जावाले लागनू.कामना दिवसमुये गाव सामसुम होतं.गावमा मांगनं डफडं वाजी रायंतं.आज मऊत होयेल से हायी डफडानी चालच सांगे.गावना बाहेर पडनू.माले कसबी करीसन बयतन जमाडनच होतं.
गलाटी नदीमा नागीनन्या काड्या जमाडूत म्हनीसन जावाले लागनू.तथा वावरवाला दिसना.ठरेल रद्द करनं पडनं.बयतन काही भेटे नही.बयतनसाठे काटाकुटा चेंदीसन जानं पडी रायंतं.पायमा खचाखच काटा घुसना की 'ओ मा' तोंडमाधून बाहेर पडे.ढोरसवाला धरनपा होतात तेनामुये जीव काही घाबरे नही.एक ठिकाने कोल्लं लाकूड दिसताच तेले दोरी बांधिसन बाहेर काढाले लागनू.तथाइन फना काढतच साप पयना.मी लाकूड सोडीसन आराया ठोकत रस्ताकडे पयनू.जीवमा जीव नही रायना होता.पोटमा पुरा खड्डा पडना होता.
आते सोबत दोरीपन नही होती.बयतननी बिपत पडी रायंती.रिकामा हात होतात.धरनना बाजूना रस्ता धरी जावाले लागनू होतू.निमखाले बसनू.सावलीमा बरं वाटे.उनना सपाटा भयान होता.दुपारना रस्तावर कुत्तलाना पन तपास नही होता.तसाच पुढे जावाले लागनू.
पुढे लवनमा घुसनू.लोखंड्यानी फांदीना आसरा लेत वावरना बांधवर चढनू.तठे शेजारे मस्त लाकडं,गवऱ्या, काड्या पडेल होत्यात.तठे पडेल वझं सोडीसन दोरी काढी.जमतीन तेवढा धाकल्ला लाकडं तिनात बांधात.आनंद होयेल होता.काही न करता एकच ठिकाने लाकडं भेटी गयतात.आजून एकदा यवूत आसं मनामा ठरायं.मांगना डफडाना आवाज जोगे जोगे वूना.
लोकं 'राम बोलो' म्हनी रायना होतात.मी बांधेल वझं लवनामा टाकं.ते लिसन लवनमाधूनच पयाले लागनू.ते जड होयी जायेल होतं.पुढे जायी थांबनू.डफडाले आते शांतता भेटेल होती.कोन से म्हनीसन परत दगडसना आसराकन वर चढनू.जठून मी वझं बांध तठेच मडं ठेल होतं.तठला लाकडं लोकं रची रायंतात.बाजूले बठेल धल्ला बिडी ओढत जोरजोरमा बोली रायना होता,
"फुलं चांगला रचा रे तेनावाला.मराना फुलंसनी पन तयारी तो करी गयता.गन कष्ट करात तेनी.आते गया सोडी देवपा."
लोकं धल्लानं आयकीसन तठे पडेल लाकडं उचली उचली रची रायना होतात नि मी इकडे लवनमाधला उचली आनेल फुलंसकडे देखी रायनू होतू.
#आमनंधाकलपन


Comments
Post a Comment