भंडारा
#आमनं_धाकलपन
भंडारा
जेठाना महिना सरी रांयता.वावरं पेरायी जायल होतात.कपाश्या,मुंग,उडीदना वावरं कोयपायी रायंतात.कपाशी कोयपाले जायेल दौलत आप्पा बैलगाडावरूनच भागवत आन्नाले बोलना,
"का रे आन्ना,आख्खाड सुरू हुयी आते.कोणता मंगयवार करतंस आपला भंडारा? देखा भौ.लवकर सांगा.पैसा जमा करना पडतीन बरं."
"आरे हाव ना भौ,तू पलाटनी आपली मंडयीले तं सांग.मी देखस तसं." आन्नानी आंगनले खट्टा मारत दौलत आप्पाले सांग.
गावना घर घरमा भंडारान्याच गफाट्या चालू होत्यात.आसं करता करता आख्खाडना समदा मंगयवार ज्या त्या समाजना ठरी गयात.आमना दुसरा मंगयवार ठरेल होता.आप्पा,आन्ना,तात्या,जिभू,भाऊ समदा एक होयेत नि भंडाराना वाटाना पैसा जमा करेत.पुरा वाटा,आरधा वाटाना पैसा ठरेल होतात.जो तो ये नि आपला पैसा जमा करी जाये.हाई समदं देखतांना आमले मस्त वाटे.आमू भंडारानीच वाट देखूत.
ठरेल मंगयवार उगताच.मायनी आमले पटकन उठाडं.तयारी होताच आम्ही परदेशी वाडामा जमनूत.तठे सायकोर मायना खाटले बांधेल दोन धाकल्ला बोकड्यासन्या दोरीसले धरासाठे आमन्या भानगडी होवाले लागन्यात.तिकडे मोठी मंडयी एक ताटमा मातामायले पुजासाठे गुलाल,कुकू,तांदूय,आगरबत्त्या,नारय जे पाहिजे ते साहित्य जमाडाले लागनात.डफडावाला देवचंद मांग आते डफडं 'धंदर तत्तर..धंदर तत्तर' वाजाले लागना.आते समदासनी लगबग सुरू झायी.जो तो आपले नेमेल काम कराले लागना.भरत काकानी खांदावर दोन लाकडं बोकड्या टांगाले लिनात.सोबत शंकरबाबा होताच.इकडे कोना हातमा पैसासनी पिसवी,कोनाकडे पुजाना ताट तर कोनाकडे हातमा झंडा होतात.समद्या वाडान्या बाया मानसं आते बाहेर यीसन गम्मत देखाले लागनात.समाजना समदा आते जमनात.जो नही तेले मातामायकडे धाडा आसा निरोप गुलाब दादानी देताच.डफडावाला वाजत पुढे निंघना.
आते आम्ही डफडावालाना पुढे नाचाले लागनूत.आज आमनी शायले सुट्टी देल होती.शायमा जानारा पोरसले आम्ही तंगड्या आथा तथा फेकी खिजाडाले लागूत.बोकड्याकडे हात दावत नाचूत.समदा झपाझप पावलं टाकाले लागनात.मिरवनूकले सुरूवात झायी होती.समदा खुशीखुशी चालाले लागनात.रायेल मंडयी आते गावबाहेर सामील झायी.बोकड्या धरेलवालासले भयान मोठं मोठं वाटे.हिनीमिनी आते धरनारा बदलाले लागनात.कोनी हातमा धरेल बोकड्यासले बाभूयना पाला खावाडे तर कोनी काय.गावना बाहेर जाताच भंडारा कोना से हायी लगेच समजी जाये.वावरमा जानारा चावयी चावयी गम्मत देखेत नि पावलं टाकेत.
माता मायना मंदिरपा उनूत.सकायले मंदिर धुयी टाकेल होतं.जो तो मंदिरना घंटा वाजी,मंदिरले फेरी मारी पुजा कराले लागना.आम्ही दरसन लिसन मंदिरना मांगे उच्चा वटावरून खाले उड्या माराले लागनूत.टाइम होवाले लागना पन थांबाडं का बं ? हाइ काही समजे नही.ठोम्या गडी कुजबुजाले लागनात.तवढात..
"ओ गुलाबदादा..! चल ना पटकन.कब से आ गये हम यहा.ऐसा मत कर रे तू.जल्दी जल्दी आना ना." देवराम आप्पा खाटीक बाबाले बोलना.
खाटीक बाबाना सोबत सायबूदादा म्हनजे तेसना पोरगापन होता.गुलाबदादानी मंडयीनी चव वयखत लगेच चालता चालता सुरा कोयता काढा.नि गरम होयेल समदा थंडा पडनात.खाटीक बाबा मंदिरपा येताच तेनी बोकड्यासले मातामायना समोर धरं.मंदिरले फेऱ्या माराले सांग्यात.बोकड्यासना कपायले गुलाल चोपडा.मातामायना समोर धरीसन समोर करेल खड्डामा बोकड्याले धरं.तेसले आडं पाडं.तेसना मुंडकीले खाले करीसन.खाले बसत.दोन जनसले पाय धराले लावात.डोया बंद करत काहीतरी बोलना नि जोरमा आरायी देत बोकड्याना मानले सुरीनी धार लायी.धार लावताच रंगतन्या चिरकांड्या उडन्यात.समदं रंगत खड्डामा मातामायले दिनं.दुसरा बोकड्याबी आसाच करा.
आते भरत काका नी शंकर बाबा येसना जोडीनी कुरबानी देल बोकड्याना पायं आपला लाकडसवर बांधात नि खांदावर धरत ठरेल ठिकाने जावाले लागनात.समदा आते मातामायनं दरसन लेत घर रवाना झायात.
घर येताच पलाटना निमना झाडखाले बोकड्या तयार कराले सुरूवात झायी.आमले आते घर माहिती नही होतं.निमनं झाड हायीच आमनं घर होतं.गुलाबदादानी झाडले टांगेल बोकड्या तयार कराले सुरूवात करी.तेले पानी आनी देनंपासून पिव्वी पटेल खावाडानी जिम्मेदारी नाना टेलरनी लिनती.तेनामुळे गुलाबदादा मंग खुशी खुशी काम करे.आम्ही बोकड्याना आतड्या गोधड्या समदं देखूत.गुलाबदादाबी बोकड्याना पार्ट पार्ट मोक्या करी आमले समजाडे.
बोकड्या तयार होताच पत्तर निमखाले टाकायनं.तेनावर बोट्या,फरे,कलेजी,खुरं,आतड्या गोधड्या येसना सारखा वाटा पडनात.एखादी बोटी इकडे तिकडे होवाले नको म्हनीसन समदा वाटा निरखीसन देखेत.जठे बोटी कमी तठे टाकाले लायेत.समदं सारखं सारखं होताच जो तो जेले पटी त्या वाटाकडे बोट दायीसन आनेल डबामा,रुमालमा ले नि घरकडे रवाना होये.आसं करत करत एक एक वाटा कमी होये नि समदाजन आपापला घर 'भंडारा' ली जायेत.घर जाताच भंडारा सिजे नि समदं घरबार मातामायना परसाद म्हनीसन 'भंडारा' खायेत.
@ गिरीजादूत
भरत पाटील
9665911657



Comments
Post a Comment