बल्लं
![]() |
#आमनं_धाकलपन
बल्लं
उमरदं आपलं मामानं गाव.पद्मालयना बाजूले ते बठेल से.धाकलपने मायसोबत तठे जात जावू.मामानं गाव कोनले आवडत नही भौ.ते आपले आवडाव नही.दिवायी आखाजीले भारी मजा ये तठे.धाकलपने आपला दोस्तबी भारी होतात तठला.मायसोबत भर उंडायामा शायले सुट्या लागन्यात की उमरदाले जावाले भेटे.
आपले चार मामा.तठेच मायनी मावशीना दोन आंडोरं त्याबी आपला सख्खाच मामा बरं.असा आपला सहा मामा.तसं मामानं गाव म्हनं की समदं गावच मामा,मामीनं रहास.मामाकडे बकरीसनं गव्हारं होतं.त्या चाराले धाकला गोटू मामा जाये.तेसनासोबत जावानी मजा ये.
"व्हय रे बाप्या..!आज गोटू मामासोबत बकऱ्या चारी ये."
माय मामाना मांगला दारे बांधेल बकऱ्या सोडत सोडत बोलनी.
मी भयान खुश झावू.पण मामानी नही सांगं.मामाले मनाडीसन मायनी मामाना भाकरसंगे मन्ही भाकर बांधी दिनी.मी बांधेल भाकर लिसन बकऱ्यासना मांगे मांगे चालाले लागनू.मामान्या बकऱ्या हुशार होत्यात.बरोबर गावबाहेर जावाले लागन्यात.कोना दारशेना वडा पापडसले तोंड बकरीनी लाव रे लाव की घरमाधून लगेच आवाज ये,
"आरे रे रे ...तथा फुकाड त्या बकल्लीसले.चवनान ढवना मजाना चाली रायना तो..फुटी गयात का तुना..."
त्या आवाजना फटकाराना सापडाना पहिलेच मामा बकरीना पाठोडामा काठी टाके नि बकरी भिनाट पयाले लागे.तेनामुळे बाकिन्या बकऱ्या निटच निंघेत.
बकऱ्या गाव बाहेर येतस नही तदलोंग समदा जीव बकरीसमा राये.बकऱ्या कधी कोना घरमा घुसतीन काही नेम नही सांगाये.हायी दरोज न होतं मामासाठे.तेनामुये मामाले कोना बोलाना रागच ये नही.मन्हा पहिलाच दिन होता तेनामुये.आयकेल गाया जशान्या तश्या देनारले बागेच मन्हाकडून भेटेत.
गावबाहेर बाकीना बकरक्या उनात.आज कोनता बल्लामा बकऱ्या चरावाले जावानं हायी त्या ठरायी रायंतात.नाथबोवा सपाटी,आडी बल्ली,कासोदा बल्लं,नाकानकोरा बल्लं,खंगार बल्ल,लांबा खोरा आसा गनज नाव आयकाले उनात.मामानी बकऱ्या पुढे हाकल्यात.माले मांगे चालानं सांग.मामा आते पुढे चालाले लागना.समद्या गावन्या बकऱ्या ढोरं गावना बाहेर दिसाले लागनात.काही आमना पुढे तं काही मांगे चाली रायंत्यात.मे मे करत बकऱ्या नि तेसना पिल्ला खेत खेत पुढे पुढे जायी रायंतात.रस्ताले टरका,मेटॕटो,रिकशा येत जात रायेत.बकरीसले रस्ताना कोपरामाधूनच चालाडनं पडे.
जसा जसा पुढे उनूत तसा डोंगर दिसाले लागनात.डोंगरं पावसायामा हिरवा दिसतस.आते उंडायामा हिरवा झाडं दिसनात की बरा वाटे तो.मामानी बल्लामा बकऱ्या घाल्यात.माले मांगे रावानं सांग.बाकीना बकरक्या जेना तेना ठरेल जागे जावाले लागनात.मामा झाडसमा कथा घुसे तेच समजे नही.झाडसना पाला कथाइन तोडी आने तेच समजे नयी.मी काटाकुटासमाधून समायी समायी पाय टाकू.पायमा चप्पलना पतडा नही होता.बल्लासना रस्ता म्हनजे थोडीसी पायवाटच राये.तठूनच चालनं पडे.जर इकडे तिकडे झाये की बोखरीसना काटा कचकन पायमा घुसेत.आल्लावनं की मामाना तिकडून लगेच आवाज ये.
"तथा लंबा घुस ना मंग.कसाले तिकडे सिलगाले गयता.."
बल्लं तसं भारी होतं.झाडं ते भयान होतात.मामा एखादं आंबानं,चिचनं झाड उन की लगेच माले खावाले दे.कच्च्या कैऱ्या खिसामा ठेवाले सांगे.भाकरसंगे खावाले भारी मजा ये.बल्ला खाले वरे करेत.पाय भयान दुखाले करेत.सुर्य आते तपाले लागना होता.बल्लं आते गरम हुयी रायंतं.तरी बकऱ्या कोठे एक जागे थांबेत नि तिसना पिल्ला ते मंग खरच नही राये तेसनं.दुपार होताच मामानी बकरीसले बल्लामाधला तलावपा आनं.तठे बकऱ्या पानी पिन्यात.मी पन मामासोबत त्याच तलाव मा पानी पिदं.मामासोबत भारी मजा यी रायंती.मी एक बकरीनं दुध पेवाले करू.तिना पाय पकडू तदलोंग ती पयी जाये.दुसरी कायी बकरीले मी धरं.तिनं दुध पेवाले लागनू.हातकन तिना पान्हा दाबाले लागनू.जसं तोंड खाले करं तशी तिनी लाथ मारी.मी मांगे फेकायनू.भयान लागनं माले मुसडाले.मी आता तथा देखाले लागनू.थोडा टाइममा आम्ही बल्लासना खाले उतरनूत.
कोनं तरी कांदासनं वावर होतं ते.बकऱ्या तठे चराले लागन्यात.मामानी आते मस्त निमना झाडाखाले माले जेवाले बसाडं.मी खिसामाधून कैऱ्या काढ्यात.मामानी हेरमाधून बादलीकन पानी काढं.त्या वावरवालापासून कांदा आना.नि खावाले बसना.मामा माले जीव लाये.मामानी लगेच त्याच कायी बकरीनं दुध तठला डबामा आनं नि माले पेवाले दिनं.भयान भारी वाटनं.बकरीनं दुध मी पन त्या कायी बकरीकडे देखी देखीच पिदं.कांदा,कैरी नि तिखटनी भाकर मजानी लागी रायंती.
जेवन होताच मामानी परत बकऱ्या बल्लामा घुसाड्यात.बकरीसले पानी दायीसन माले एक दगडवर बसाले सांग.मी बसनू.मामा पुढे पुढे जात रायना.मी एकटाच होतू.दूर दूर लोकसना पतडा नही होता.मी टरकायी रायंतू.कसामसा आवाज उनात की जीव घाबरी जाये.तदलो़ंग मामाना आवाज उना.मी तथा दुडकन पयाले लागनू.मामासोबतच मी आते फिरू.बकऱ्या नि पिल्लासनं आते पोट भराले लागनं होतं.संध्याकाय होवाले लागनी.बकऱ्या आते बल्लाना बाहेर येवाले लागन्यात.मामा एक एक बकरीले हाकलाले लागना.एक पिल्लं बल्लामा रायी गयं हायी मामाले आल्लावनारी बकरीवरून समजनं.मामानी मन्हा आंगे बकऱ्या लायात नि तेले देखाले बल्लामा परत गया.आता मी बकरीसले हाकली हाकली दमनू.मामा पिल्लाले कड्यावर लिसन उना.पिल्लानी माय मे मे करी आथा आरधी होयल होती.मामानी ते पिल्ल सोडताच ते तेना मायपा जाताच पान्हाले बिलगनं.बकरी तेले चाटाले लागनी.मामाले भयान आनंद होयना होता.मामानी लगेच बल्लाकडे देखत बकऱ्या हाकल्यात.आम्ही परत रस्ताले लागनूत.आते आजूबाजूले जायेल बकरक्या सोबत चालाले लागनात.दिवसभर काय काय झायं ते एकमेकसले सांगाले लागनात.बल्लासन्या भूतसन्या गोष्टीबी आते आयकाले भेटाले लागन्यात.झापट पडाले लागनी होती.घरपा बकऱ्या येताच घरना डालकाखाल्ला पिल्ला आजीनी सोडात.त्या तेसन्या मायीसले बिलगनात नि मी पन मायले झांबलत झांबलत पुढला दारले उनू.मायपा जाताच माय आजीले बोलनी,
"देखं व ताई,मन्हा बापू कशा तुन्या बकऱ्या चारी लयना.बल्ला खल्ला समदा देखी उना तो."
माय लगेच माले लिसन मामाना मांगला दारले उनी नि दोन पिल्लासले जोगे लेत बोलनी,
"बाप्या तुले कोनतं पिल्लू पाहिजे..?"
मी मायले धव्या रंगनं पिल्लू दाखाडं.मायनी समदा मामासले ते माले देवानं सांग.
- भरत पाटील
9665911657
#आमनं_धाकलपन



Comments
Post a Comment