दिवाई
🎉🎊🪄🎁🎆🎇🌌💥✨💥👑
#आमनं_धाकलपन
दिवाई
दिवाईनी समदी गँग जमेल होती.जेना तेना घर पाहुणासनी रांग लागेल होती.आपलाकडे भर उंडाया होता तेनामुळे आपण एकलाच चालो गडी होतूत.समदासना गलकामा मनी इतकाना फटाकडा लिनात,मनी तितकाना फटाकडा लिनात,मनी आसं करं म्हणीसन माले इतकाना फटाकडा लिनात,गप्पा रंगेल होत्यात.आपले तर आजून काहीच भेटेल नही होतं.तेनामुळे मी मना समदुःखी गँगमा झामली रायंतू.जगमा एकटा कोणीच नही रास समदासले कोणीनाकोणी भाऊबंद भेटस म्हणजे भेटस.आपला जोडीदार जिभू होता.तेनामुळे हालकं हालकं वाटनं.भलता टाईम बोलामा गया.इकडन्या तिकडन्या गप्पा,मजा होयनी.आते संध्याकाय होवाले लागनी.समदा आते गावबाहेरना मठकडे दिवा ली जावाले लागनात.देवसनी दिवाई पहिले राये गावले.
आमनी समदी गँग मठकडे पयनी.भोलू,निलू,जिभू,चंदू,उमेश,भैया,भावडू उरेल आरेल समदा मठमा जमनात.गावना बराच मोठमोठा लोक आणि जेमतेम लोकपण देवसना दिवासमा थोडं थोडं तेल टाकाले येत.बरकत म्हणीसन सुखी रावाना आशीरवाद लेत.गावना घरसमाधली दिवाई देवसना मंदीरमा पण चमकाई जाये.
आमनं समदं ध्यान मठमा होतं.शंकरबाबानी आराई दिनी,
"ओ पोरसव्हन,चला रे भौ! लावा पटपट दिवा.बाकी चढा भितवर,बाकी मंदीरसवर,बाकी तेसनामा समाईसन द्या दिवा."
समदासनी शंकरबाबाले आयकताच मठनी भित,मंदीर समाई लिनात.आपला वाटालेपण महादेव मंदिर उनतं.शंकर बाबानी लायेल दिवा पटपट पोरं देवाले लागनात.बाबानी बेकार दिवा लायेल होतात.एकटा माणूस बेकार काम करे आसे वाटे.आम्ही दिवाईले मदत कराले जाऊत.एक एक दिवा हातोहात मठना भितीवर ठेवात.चतुर्भुज,दत्त, मारोती,शनि,संतोषी,भैरव,महादेव असा समदाच मंदीरसवर आते दिवा लावाई गयात.गावनी खरी श्रद्धा आठेच होती.देवसनी दिवाई सुरू हुई गयती.दिवासमुळे मंदिरं एकदम भारी वाटेत.आम्ही एकमेकसले म्हनं मंदीर बेकार भारी दिसी रायनं,म्हनं मंदिर आसं तसं म्हणीसन एकमेकसले खिजाडूत.भारी वाटे.बाबानी काम होताच समदा पोरसले सकाळ पणत्या जमा कराले या म्हणीसन सांग आणि घर जावाले लावं.आंधार पडी गयतं.घरकडे जाताना मांगे देखताच आंधारामा मठ आणि मंदिरंसनी रोशनाई भयान भारी वाटी रायंती.छोटा दिवासमा बेकार ताकत रास हाई तवयच समजी गयतं.घरकडे आम्ही फटाकासना आशाकन पयनूत.गावमाधून फटाफट फटाकासना आवाज ई रायंता.
घर जाताच जेवन खावनना टाईम मारी लिना.घरमाधून फटाकडा भेटतीन आशा नही होती.पटकन मायले सांगी भारतदादाना घरकडे चक्कीना चौककडे मी पयनू.तठे दणादन फटाकडा फुटेत.तगारीन तगारी फटाकडा देखीसन भयान जीव तुटे.वाडामाधून जिभू,निलू,भोलू आम्ही एक ठिकाणे जमनूत.चक्कर,कोटी,सुतळी,लोंगीनी लट,सुनसुनरी,नागगुई,बंदूक समदं देखीसन आम्ही भयान जावूत.देखाशिवाय हातमा काईच नही होतं.आगपेटीवर,दिवावर आणि आगरबत्तीवर फोडानात फटाकडासना वाटा पडी जायेल होता.आम्ही समदा चक्कीना कोपराले होतूत.दणादण फटाकडा फुटेत.मेन रस्तालेच बामणसना घर होतात आणि तेनामा दिवाई तं गावमा आठेच भारी वाटे.नवीन काहीतरी उनं ते आठेच दिसे.तेनामा देखासाठे आम्हीच समदासना पुढे राहूत.या घरमाधून हा फटाकडा लावा तं दुसरा घरमाधून दुसरा फटाकडा लावाये.आठेपण नुसता फटाकडासवरूनपण आमना वाटा पडी गयात.काही रस्ताना इकडे काही तिकडे.आमना फटाकडा ना आवाज जास्त झाया तं आम्ही उड्या मारूत नहीतं समोरला मारेत.भयान भारी वाटे.घरवाला फटाका लाये आणि आमले वाटे आम्हीच लाई रायनूत की काय? आमनाच दांगडो होयेत आठे.फोडणारा एककडे आणि आम्ही फुकटखाऊ एककडे.
बेकार चुरस चालू होती.दोन्हीसनकडून एकतून एक फाटाका लावायेत.तेनामा आते आमना गुलाबी रंगना अंगठीएवढा लोंग्या फटाकाना नंबर उना.एक एक दिवावर,अगरबत्तीवर लाई लाई फेकाले लागनात फोडणारा गडी.आम्ही गम्मत देखामाच होतूत.तेनामाच पोटभरी रायंत.तेवडामा पुरी लटन् लट दादानी लाई दिनी आठे गल्लीमा फेकी दणादणा वाजाले लागनात.काही फुस गयात.त्या नही फुटेल आम्ही उचलाले लागनूत.फूस होयेल समदा आते खिसामा पडाले लागनात.तिकडे त्या गडी लटानलटा लाई लाई फेकाले लागनात आम्ही लोंग्यांससाठे शिलगेल फटाकडा मलावाले लागनूत.कोणा पायपा फुटे तं कोणा हातमा फुटे.गाया दी दाई लोंग्या खिसामा जायेच.पहिले पहिले तेसले भारी वाटे.आमलेपण भारी वाटे.फुगटना लोंग्या भेटेत म्हणीसन.आते आम्हीपण तठेच खिसामाधला लोंग्या फोडाले लागानूत.दारू दारू कागदमा जमाडी शिलगाडाले लागनूत.थोडा वातवाला लोंग्या बेकार हातमा फुटेत.मजा ई रायंती.उरेल आणि विशेष बिगर फुटेल फटाकापण काममा येतंस हाई आमले समजणं होतं.आते आम्ही सुतळी बॉम्बकडे आगेकुच करी.
लोंग्यासनी जागा आते सुतळी,लक्ष्मी,डबल बार,सिंगल बारनी लेल होती.लोंग्यासना आमना आत्मविश्वास जागेल होता.शिलगेल फाटाकडासपा जाणं आमले आते काही वाटे नही.फोडणारसलेपण आमना आजूबाजूले फाटाकडा फुटनात तं भारी वाटे.मजा ये.आमले फक्त शिलगेल फटाकडा मलावाना आणि आम्ही तो परत फोडना हाच उद्योग ध्यानमा ठेल होता.पहिले समदाजण एकवर एक पडेत तेनामा तो फटाकडा फुटी जाये.कोणलेच काही भेटे नही.आम्ही आते नंबर लाई लेल होतात.फोडणारसना ध्यानमा येताच तेसनी समदा फाटाकडा घरमा ठेवात आणि झाई दिवाई म्हणीसन आमले घर काढं.आम्हीपण घर जावान नाटक करं आणि काही वाडाना भितपा काही रस्ताना भितपा लपी रायनूत.वाट देखाले लागनूत लपीलपी ह्या कवय बाहेर निंघतीन आणि निंघनात गडी फटाकडासनी भरेल तगारी लिसन.
थोडा टाईम होताच परत फाटाकडा फोडाले सुरूवात करी.आम्ही एक एक तठे परत जमनूत परत लोंग्या,सुतळी,लक्ष्मी,डबल बार,राकेट,चक्कर दणादण फुटाले लागनात.तसा आम्हीपण जो सापडी तो मलावाले लागनूत.आते आम्ही बेकार गाया खाई रायंतूत.जो सापडना तो दोन तीन चापटापण खाई रायंता.समदा जिदवर होतात.मार खादा वा गाया खाद्यात की तो गडी जास्त जिदवर जाये आणि शिलगेल कोणतापण फटाकडा मलावाना प्रयत्न करे.आसी दिवाई भयान भारी वाटे.आते टाईम हुई गयता.समदाकडे फटाकडासना वास ई रायंता.खरी दिवाईना आनंद लेवाई गयता.प्रत्येकना खिसामा आजनी कमाई होती.काही फुटनी होती.काही घर जाई फुटणार होती.
घर जाताच जेनीतेनी आपला खजाना बाहेर काढी जेनातेना घरपा फटाकासनी दिवाई साजरा करी.घरवालासना बोलपण खादात आणि चटका लागेल ठिकाणे तेलपण लावाना कार्यक्रम करी लिना.मस्त झोप लागनी होती.आते परत कालदीन तेसनी भयान फटाकडा फोडाले पाहिजेत आणि फुसक्या निंगीसन आपले भेटाले पाहिजेत आसे वाटे.सकायले झापटमाच गुलाबी थंडीमा चक्की फटाका फोडेल होतात तठे गवू.तठे पहिलेच भोलू,जिभू पहुची जायेल होतात.पटकन अंधारामा नही सापडेल फटाका झामलाले लागनू.तेसले बराच सापडी जायेल होतात.पुरा चौक फटाकडासना गालीचा वाटे.समदा प्रकारना फटाकडासन दर्शन आठेच होये.आमनीपण आठे हौस भागी जाये.
दिवाई खरी चक्कीना चौकमाच होये आमनी.दर दिवाई आणि नवीन पिलॕन ठरेल रायेत.कधी हातमा तर कधी पायना खाले फटाका फुटेल होतात.हातसले मोठमोठा फोड पण येत पण शिलगेल फटाकडा मलावानी आणि गाया खावानी,कधी कधी मार खावानी मजा बेकार राये.आमनी दिवाई बरीच चक्कीपाच होये.धाकलपणनी दिवाई,मठ,चक्कीना चौक ठरेल ठिकाणं आजपण डोयासमोर जसीनातशी दिवाई उभी करतंस..!
आमनं_धाकलपन
- भरत पाटील
9665911657


Comments
Post a Comment