दा रूप्या

दा रूप्या
भरत पाटील

       गसोडं सोडीसन नवा कपडा घालानी तयारी करी रायंतू.मायनी तयारी हुई जायेल होती."मी येस तदलोंग कपडा घाली ठेवजो.इकडेतिकडे हेलपाटा नको मारजो." म्हणीसन माय दुकानवर पिवळी पटेल लेवाले जायेल होती.पटापट गसोडामाधला कपडा खालेवरे करीसन मना कपडा काढात.शाळानीच धव्वी कुडची आणि खाकी चड्डी आंगवर चढाई.रंगीतना जमानामा जावाले आजून थोडा दिवस बाकी होतात.कपडा घालीसन बाहेर वट्टावर बसीसन मायनी वाट देखी रायंतू."का रे गावले जावाना विचार से का काय?" आण्णा बोलना."हा" बोलनू.

        वट्टावर इकडेतिकडे काठ्या मारी मारी गानासना भूगा हुई रायंता पण माय काही येवानं नाव ले नही.गावले जावानं होतं म्हणीसन मायले देखाले दुकानना रस्ताले चालता होयनू.शाळाना कपडा होतात तरी लाजी लाजी मनमान मनमा खुश हुई पई रायंतू.माय समोर दिसताच बेकार आनंद झाया.घर येताच तयारी होयेल होती.मायनी कचकाडाना पिशवीमा मिस्रीना चुटका टाका.पिवळी पटेलपण टाकी आणि गावाले जावाना पिशवीना कोपरामा दोन्ही पुड्या खोशात.मायनी कालदीन येसूत म्हणीसन आत्याना गावना रस्ता धरा.मीपण मायना मांगे मांगे मस्त चालू लागनू.बांबरूड रस्ता लागस नही तदलोंग गावनं प्रत्येक घर माले हासी रायतं की काय आसे वाटे.लोकं दिसनात की मान खाले घालानी आणि गुन्नमुन्न खुशी खुशी चालानं.नवा शाळाना डरेस भारी वाटी रायंता.

        चावडी जाताच बांबरूड रस्ता लागना.माय झपझप चाली रायंती.मी मांगे मांगे पई रायंतू.दोन किलोमीटर अंतरवर बांबरूड गावपासूनच भडगाव पाचोरा डांबरी रस्ता जायेल होता.हिरवागार झाडसनी सावली मस्त वाटे.मायना पुढेपुढे पईसन झाडखाले काडीकन काहीतरी काढानं आणि माय पुढे गई की हाक येताच पयानं ठरेल होतं.

        बांबरूड येताच एसटीमा आम्ही बसनूत.धाकला से म्हणीसन तिकीट काही लागनं नही.एसटीमा बेकार मस्त वाटी रायंत.सीटवरून उचकीसन डायवरले देखी देखी जसं काय मीच गाडी चालाडी रायनू आसे वाटे.भडगाव येताच.कालीपिलीमा आम्ही बसनूत.मायजोगेच बसाले भेटनं.तेसन्या गप्पा आयकता आयकता पारोळा उनं.तटून आत्याना गावले जानं होतं.तेनामुळे पांढरी मोठी गाडीमा बसनूत.तिले लक्झरी म्हणेत.एसटीसारखीच होती.समदी भरी जायेल होती.पहिलाच गावले उतरनं होतं म्हणीसन पुढेच मायनी मनं पखोल्लं धरेल होतं.गाडीमा इकडेतिकडे नजर मारताच सीटवर बसेल लोकं बेकार श्रीमंत वाटेत माले.मधमा उतरनं से म्हणीसन सीटवर आमले बसू दिनतं नही गाडीवालानी.गाडी सुरू होयनी.

        "बेटा,कितवीला जातो तू?" असा आवाज माले बाजूतून उना.मायनी मनाकडे देखीसन "बोल रे" . एकदम धव्व्या कपडासना तो माणूस.दाढी वाढेल.डोयासवर चष्मा लायेल.हातमा एक काई बॕग.वाचाले पेपर.तो मनासंगे बोली रायंता पण मी तेले घाबरी रायंतू.दोस्तमंडळीसमा आयकेल होतं,दाढी वाढेल लोकं आणि तेसना कारनामा डोयासमोर उभा रायनात.पाय थरथर कापी रायंतात.

"अरे घाबरू नको,इकडे ये.कितवीला जातो तू.बस इथं माझ्याजवळ".

     मायनी लगेच माले पुढे ढकलं.त्या धव्व्या कपडावाला माणूसनी लगेच बॕगमाधून दोन चॉकलेटी बाहेर काढ्यात आणि एक तोंडमा टाकीसन माले एक दिनी.चॉकलेट भेटताच मी तेनापा बसनू.चॉकलेटमुळे तेसना समदा प्रश्नसना उत्तरं पटापट दी टाकात.तेसनी बाजूले पडेल लोकमत पेपर लीसन माले वाचाले सांग.मी गरागर वाची दाखाडं.तेनी लगेच मायले विचारं."काय करतंस तुम्ही?" मायनी त्या भाऊले घरनी समदी परिस्थिती सांगी.तो भाऊ मनाकडे देखीसन खुश होयना आणि "हा मुलगा मोठा होईल". आसं मायले सांग.माय लगेच बोलनी,"आपला हातपाय चालतीन तदलोंग शिकाडूत.नही तं करना पडतीन आपलासारखा कामं.कोणाकडेपण धरी साल मंग". त्या माणूसनी लगेच मायले थांबाडं आणि माय याले शिकाडजो म्हणीसन बोलना.आमनं उतरानं गाव जोगे उनतं.मी मायपा उभा रायनू.त्या माणूसनी माले काई बॕगमाधून लगेच दा रूपयानी कोरी नोट दिनी आणि बोलना,"वही,पुस्तक,पेन घे तुला.खूप छान वाचलं तू.अभ्यास कर.हुशार आहेस." तेसना ह्या शब्द आयकताच आंगमा काहीतरी होवानी जाणीव होयनी.नही म्हणू.लाजनू.आजूबाजूना समदासनी सांग म्हणीसन मी त्या हातमा लिनात.तवय शब्दसपेक्षा दा रूपयानी करकरीत नोट हातमा देल भारी वाटी रायंती.त्या माणूसकडे मी परत परत देखी रायंतू.तो गालमान् गालमा हासे मनाकडे देखीसन.गाडीना खाले उतरताच.मायनी एक हातमा पिशवी आणि एक हातमा माले धरं.मी मांगे देखीसन खिडकीमाधून त्या माणूसले देखी रायंतू.त्या खिडकीमाधून माले टाटा करी रायंतात.मी हासीसन वरे हात करा आणि तेसनी हात हालावा म्हणीसन मीपण हात हालावाले लागनू.मी दा रूप्या एक हातमा पक्का धरी ठेल होतात.मायनी दा रूप्या गाडीना खाले उतराना टाईमलोंग मनापा राहू दिनात.गाडी धकताच मनापासून हिसकाई लिनात.दवडाई टाकसी.घर देसू म्हणीसन ली टाकात.मी रडाले लागनू.दोन तीन धपका पाठवर बसेलनंतर गुन्नामुन्ना चालाले लागनू.

       गावले रातभर रायनूत पण समदं चित दा रूपयामा होतं.गावनं जेवण,पाणी,भेटाना आनंद होताच पण दा रूप्या परत परत डोयासमोर ये.दुसरा दिन घर उनूत.मायनी गाडीवालाले पैसा दिनात की हातकडेच ध्यान राहे.मना दा रूप्या मायले दिऊ दिनातच नहीत.मायकडून रडी रडी दा रूप्या लिनात तरच रायनू.मी मना गोखलाना पुस्तकमा दा रूप्या ठी दिनात.दरोज जवय याद उनी तवय दा रूप्या देखू आणि खुश हू.तो माणूस सारखा डोयासमोर ये आणि आजून अभ्यास कराना संदेश दे आसे वाटे.चार पाच दिन आसाच निंघी गयात.मी बाहेर जाई रायंतू.माय म्हणी रायंती,"मजुरीना पैसा भेटतात तं साखर,च्या,तंबाखून्या पुड्या आणाई जात्यात माय." मी आईकीसन बाहेर खेवाले चालना गवू.माय वावरमा जाई रायंती.जेवण करी लेजो आणि घर नीट लावजो म्हणीसन सांगी गयी.

       मी घर उनू.घर चंदूले लई उनतू.तेले दा रूप्यानी गोष्ट सांगी होती.ती दा नी कोरी नोट देखाले तो घर उनता.दरोजसारखं जेवण करीसन मस्त वाचाले बसनू तदलोंग तेनीच याद दिनी दा रूप्यानी.मी आनंद खाले तेले आजून गावनी आणि धव्व्या कपडावाला,दाढीवाला माणूसनी गोष्ट सांगी रायंतू.गोखलामा दा रूप्या झामली रायंतू.दा रूप्या पहिले पुस्तकमा देखात.नही सापडनात.पोटमा गोया उना.समदा पुस्तकं,वह्या,पिशवी झामली काढी पण सापडानं नाव ले नही.मना रडका चेहरा हुई गया.दा रूप्या चोराई गयात आसं वाटनं.चंदूपण मी झामली रायंतू तदलोंग "तू झामली ठेव,सापडनात की दाखाडजो" म्हणीसन पई गया.मी घामाघूम झावू पण माले दा रूप्या सापडनात नही.आते माले करमे नही.मायले मी त्या मोडू दिनतात नही.रडू रडू जीव हुई गयता.अचानक मायना शब्द आठवनात,"मजुरीना पैसा......." 

        घरमाधलाच समोरना गोखलाकडे ध्यान गयं.तठे साखर,च्या,तंबाखून्या पुड्या दिसन्यात.मी ढसाढसा रडाले लागनू.पाय आपटाले लागनू.मना दा रूप्या मायनी खर्ची टाकेल होतात.दिवसभर जेवण नही गयं.संध्याकायले माय येताच.दांगडो घाला.मायनी आयक आयक आणि बोलनी,"खावाले कोठे जास तू?घरमा खावाले नही आणि दा रूप्या दे,दा रूप्या दे.काय लाई दिनं मरजायजोनी". माय संताप करी रायंती आजून दोन तीन धपका खाईसन मी गुन्ना मुन्ना बसनू.रागना भरमा रातले पण जेवण नही करं.दिवसभर भुक्या होतू माय समजी जायेल होती पण तिनीपण तलपनं काम धकाडी लिनतं.सकाय होताच पटकन मी भाकरनं डालकं झामलं आणि चतकोर थंडी भाकर गपागप खाई लिनी.धव्व्या कपडासवाला.दाढीवाला काकानी दा रूप्यानं बक्षिस  भेटेलनी भूक आजपण तशीच डोयासमोर येस....!

- भरत पाटील
9665911657

#आमनं_धाकलपनं

Comments

Popular Posts