धस

धस
- भरत पाटील

     "अय,मनी आत मोडी आण बरं", असं म्हणीसन भैया जवारीना धस खाले वाकी वाकी वेची रायंता.बाप्याले बरच उरकी रायंत म्हणून तो धसं पटापट वेचीसन पुढेपुढे जाई रायंता.बाकीना मांगे रायेल व्हतात म्हणीसन त्या बाप्याले मनमानमनमा गाया टिकाडतं होतीन येना अंदाज बाप्याले होताच पण काय करी जेनी पटापट काम करं वा जेनी आत पहिले लागी तेले धसं सिलगाडाले भेटे या आशाखाले बाप्या पटापट काम करी रायंता.दुपार व्हयनी की धसं सिलगाडानी आस आपोआप समदासले लागे.तेनं कारणपण तसंच राये.मस्त सायकलनं टायर लेवानं,उभे उभे मस्त जवारीना भुगला सिलगाडतं सिलगाडतं काम करनारसना बरोबर ईसन थोडं पंधरा मिनिटे-तीस मिनिटे आराम कराले भेटे आणि शासुजकदारपणे मस्त कोणापण आतमा जाईसन थोडं बोलाले भेटे.

          बाप्याना डोयासमोर टायर,भुगला आणि मस्त आराम ई रायंता तवढात जोरमा पायमा काहीतरी घुसनं म्हणीसन बाप्या बोलना,"ओ बापरे!" डोकामा चर्र होयनं आणि डोयामाधलं पाणी घळघळ व्हावाले लागणं.पाय पुरा रक्तना भरी गया.खाले बठीसन बाप्यानी पायमा घुसेल धस पटकन काढं.ते खोल घुसेलमुळे रक्त काही थांबेना.बाप्या घाबरना. आते आपले काही धसं सिलगाडाले भेटाव नही म्हणीसन चिंता करू लागना.तेवढामा कोणले काही समजनं नही तं आपले धसं सिलगाडाले भेटीन म्हणीसन तो मांगे रायेल भैयाले,बोलना,"भैया,मी पाणी पी येस,थोडंच बाकी से मंग तुनी आत आणस".भैयानी मान डोलाई.बाकीना जोडीदार गणज मांगे होतात तेनामुळे तेसले काहीच समजनं नही.बाप्या पाय तिरपा करी करी चाली रायंता.भैयानी विचारं पण काही नही म्हणीसन बाप्या बळजबरी सरळ चालाले लागना.अन् आजून   पाय जोरमा दुखाले लागना.रक्तपण काही थांबना नाव लेईना.

      पटापट झाडखाले येताच बाप्यानी घटघटा पाणी पिदं आणि शेजारनी विहीरना ठिकाणे घावटीना पाला सापडताच पटापटा पायले लाई लिना तेनामुळे रक्त येणं ताबडतोब थांबण.डोकाना रुमाल पायले गुंडाया.वावरमाधला घायपातना पाला म्हणजे मजूरसना हक्काना वावरमाधला आयुर्वेदिक साथी.लागनं की झामल घावटीना पाला आणि लाव लागेल ठिकाणे.हा उद्योग ठरेलच राये.बाप्यानं पायनं दुखणं थोडंथोडं कमी होयल होतं.तसाच पटापट आत लाईसन भैया आणि इतर जोडीदारसनी आत बाप्यानी मोडी लागी.समदा दुपार होयेलमुळे शेवटली आत लेवासाठे आपापला आतसमोर उभा रावाले लागनात पण बाप्यानं ध्यान समदं वावरवालाकडे लागणं होतं.वावरवालनं ध्यान आपलाकडे रावाले पाहिजे म्हणीसन सकायपासून पटापट काम करी रायंता आणि वावरवालानी दोनतीनसाव करेल कौतुक होतं सोबतले.तेनामुळे आपणच आज धसं सिलगावसूत म्हणीसन मनमानमनमा बाप्या खूश होता.पायनं दुखणं तं सोबत होतं पण धसं सिलगाडानं सुख तेले पाहिजे होतं.तेपण एक कामच होत पण ते भेटणं म्हणजे आपण काहीतरी बाकीनासपेक्षा आल्लक सेतस आसे वाटे.

       पायमा काहीच नही होतं तेनामुळे गरम ढेकायसनी जमीन पाय सेकी रायंती बाप्याना आणि तेनामा पायमा घुसेल धस आग करी रायंत.तेवढात वावरवालाना आवाज उना,"भैया,चाल भौ भुगला सिलगाड बरं आणि दादाभू,तू भुगला हालावाले जाय". हाई आईकीसन बाप्याना जीव पाणी पाणी व्हयना.बाप्याले भुगला सिलगाडाले भेटनं नही.तेले काय करावं तेच समजेना.समदाजण आपापला आतले लागना होतात.शेवटली आत आणि लवकर घर जावाले भेटी म्हणीसन समदा पटापट धसं वेचू लागनात.गरागर भुगला गोया होवाले लागनात.भैया मस्त मोठामोठाईन गाणा म्हणीसन टायर लीसन भुगला सिलगाडे आणि दादाभूपण तेले साथ देत मांगे मांगे मस्त भुगलासना बाहेर येलं धसं एक करी हालाये.बाप्याना डोकामा फक्त  सालं आपले काबं नही सांग मालकनी? तेच समजे नही.सकायपासून पुढे राहणारा बाप्या शेवटली आतले समदासना मांगे रायेल होता.अर्धालोंग आत येताच धस लागेल पायलेच आजून ढेकायं जोरमा बसणं बाप्याले नको नको झायं.आजूबाजूले देखीसन डोयामा येल पाणी पटकन पुसं आणि जवळ येल भैयाकडे देखीसन एक दिवस मालक आपले धसं सिलगाडाले सांगीच या आशाकनं परत पटापट धसं वेचाले लागना.मान खाले घालीसन पटापट धसं बाप्या वेचू लागना.घामना धारा वाही रायंत्यात पण दिवसभरना आत लावाना एक नंबर बाप्याले सोडना नव्हता.गरागरा भुगला जमी रायंतात.बाप्या बांधवर कवय पोहोचना हाई तेलेच समजनं नही.जवय वर करी देखं तं बाप्यानी दिवसभरना एक नंबर जसानातसा शाबूत ठेल होता.पटकन आत लागनी म्हणीसन भैयाले मदत करानासाठे आणि मनमाधली इच्छा पुरी करासाठे धसं सिलगाडाले बाप्या जाई रायंता तदलोंग वावरवालानी बाप्याले हाक मारी,"ओ बाप्या,तेवढ्या बाकीनासन्या आथा मोडू लाग रे भौ,उकाव जल्दी घर जावाले भेटी,काय हाईगाईनं उनं पडानं का हाई?". बाप्याले वावरवालानच उन जास्त लागेल होतं.तो व्हता तठेच थांबना आणि लागेल पायनाखाले येल धसकडे भरेल डोयासनकन देखी रायंता....!

- भरत पाटील

# आमनं _धाकलपन

Comments

Popular Posts